Search More SMS in Different Languages...




सुगृहपती

सुगृहपती

युवती- बाबा, आमचे स्वभाव, सहजीवनाविषयीच्या अपेक्षा मिळत्याजुळत्या आहेत. आम्ही परस्परांना अनुरूप वाटतो, आवडतो. मग काय हरकत आहे आम्ही लग्न करायला? 
बाबा- पण तो तुझ्यापेक्षा कमी शिकलेला आहे!
युवती- तो कला शाखेचा पदवीधर आहे!
बाबा- पण तू आहेस पीएच.डी. कोणत्या पुरुषाला आपल्यापेक्षा एवढी जास्त शिकलेली बायको सहन होणार आहे?
युवती- बाबा, तो तसा नाहीये! 
बाबा- आज तो तुझ्या प्रेमात पडलाय म्हणून त्याला या फरकाचं काही वाटत नाही. पण नव्याची नवलाई संपली की पुरुषी अहंकाराची मोगलाई सुरू होईल, तेव्हा पस्तावशील. उगीच नाहीत आमचे काळ्याचे पांढरे झालेत! 
युवती- मला तुमच्या एवढय़ा वर्षांच्या अनुभवाविषयी पूर्ण आदर आहे. तरी पण तुमच्या वेळच्या कल्पना आता कालबाह्य झाल्या आहेत.
बाबा- कोणी सांगितलं तुला?
युवती- वैज्ञानिक संशोधनानच हे सिद्ध झालंय! विस्कॉन्सिन विद्यापीठाच्या क्रिस्तीन श्‍वार्झ यांनी केलेल्या संशोधनात त्यांना असं आढळलं आहे, की १९५0 ते १९७८ या काळात पुरुषांना स्वत:पेक्षा कमी शिकलेली बायको जास्त पसंत असायची. पण १९७९ नंतर ही मन:स्थिती बदलत जाऊन आपल्याएवढी शिकलेली बायकोही पुरुषांना पसंत पडू लागली. आता तर आपल्यापेक्षा जास्त शिकलेली बायकोही पुरुषांना आवडते. 
बाबा- आवडणं वेगळं आणि जन्मभर सुखानं एकमेकांबरोबर नांदणं वेगळं! 
युवती- त्यातही बरोबरीनं किंवा जास्त शिकलेल्या बायका अधिक सरस ठरतात. जास्त शिकलेल्या बायकांमधलं घटस्फोटांचं प्रमाण कमी आहे, असंही या संशोधनात दिसलं. किंबहुना, आता तर अधिक शिकलेल्या बायकोला उत्तम संधींचा लाभ घेता यावा म्हणून प्रसंगी स्वत:चं करिअरही बाजूला ठेवण्याची नवर्‍यांची तयारी असते. आम्हीसुद्धा ठरवलं आहे, की त्याला स्वयंपाकाची आणि कलांची आवड असल्यामुळे मी सुगृहिणी बनण्याऐवजी तो सुगृहपती बनून घर सांभाळून त्याच्या कला जोपासेल आणि मी माझं संशोधन पुढे नेईन!
बाबा- तुमचा विज्ञान आणि विचारावर आधारलेला निर्णय मला मंजूर आहे! 

No comments:

Post a Comment